Contact Us :
आरेवारे समुद्रकिनारा रत्नागिरी , आरे वारे
एका बाजूने घाट आणि दुसऱ्या बाजूने समुद्रकिनारा असे सहसा न पाहिलेले "कॉम्बिनेशन' पाहायचे असेल, तर रत्नागिरीजवळच्या आरेवारे बीच ला भेट द्यायलाच हवी. रत्नागिरी पासून साधारण 15 किलोमीटर अंतरावर आरेवारे समुद्रकिनारा आहे. पर्यटकांची नेहमीची गर्दी, समुद्रकिनाऱ्यावरील कलकल इथे बघायलाही मिळणार नाही. त्यामुळेच दूरवर पसरलेला समुद्र, पांढरीशुभ्र रेती, आजूबाजूला नारळाची आणि सुरुची बने अशा अस्सल कोकणातील निसर्ग सौंदर्याचा अनुभव येथे घेता येतो. अजूनपर्यंत पर्यटकांची "वक्रदृष्टी' इथे पडली नाही; हेच आरेवारेच्या सौंदर्याचे गुपित आहे. रत्नागिरी - गणपतीपुळे घाट रस्त्याने निघाले, की एका बाजूला लाल मातीचे डोंगराकडे आणि दुसऱ्या बाजूला समुद्राचा नजारा; शिवाय रस्ताही
ळणावळणाचा... या वाटेवरून जाणे हा देखील वेगळाच अनुभव असतो. इथे यायचे असेल, तर शक्यतो, स्वत:चे वाहन असावे. रस्त्यावरून थोडे खाली उतरले, की समुद्रकिनाऱ्यावर आपण थेट समुद्रकिनाऱ्यावर येऊन पोचतो. पाच ते सात किलोमीटर लांब हा किनारा पसरला आहे. पर्यटकांसाठी असणाऱ्या जेवणा-राहण्याच्या सोयी येथे नाहीतच; जवळच असलेल्या आरे आणि बसणी गावात राहण्याची घरगुती सोय होऊ शकते. इथली शांतता, खळाळत्या लाटांचा आवाज ऐकत इथल्या निसर्गाशी एकरूप व्हायचे असेल, तर घाईघाईत येण्यापेक्षा जरा निवांत वेळ काढून यावे. गणपतीपुळे, भगवती किल्ला, मालगुंड, वारे खाडी अशी काही ठिकाणेही येथून जवळच आहेत. पण या सगळ्या ठिकाणात समुद्र किनाऱ्याचे "स्वयंभू रूप' पाहायचे असेल, तर आरेवारे शिवाय पर्याय नाहीच.