Contact Us :
निवती समुद्रकिनारा , वेंगुर्ला | निवती बीच , सिंधुदुर्ग | Nivati Beach , Vengurla
कुडाळपासून साधारण २५ किमी वर निवतीचा किनारा आहे. कुडाळ- पाट - म्हापण - निवती असा प्रवास आहे. खाडीच्या दक्षिणेकडे निवती बंदर आणि उत्तरेकडे श्रीरामवाडी. निवतीला विजयालक्ष्मी पंडितांचे घर आणि आंब्याची विस्तीर्ण बाग आहे. निवतीच्या पूर्व-दक्षिण समुद्र किनारा पसरलेला आहे. सकाळी आकाश निरभ्र असेल तर सुर्योदयाचे फोटो छान मिळतात. गावाच्या पश्चिमेस निवती किल्ला समुद्रात पाय पसरून उभा आहे. किल्लयावर पडके बुरूज, खंदक आणि बऱ्यापैकी झाडी आहे. क्वचित मोर आणि जंगली प्राणीही दिसतात. भोगव्याच्या बाजूने थोडीशी दमछाक करणारी चढण आहे. किल्ल्यावरून भोगव्याचा किनारा अत्यंत सुंदर दिसतो. तासन तास इथून जाऊ नये असे वाटते. संध्याकाळी सूर्यास्ताचे मनोहारी दृश्य दिसते. भोगवे-निवती किल्ला-निवत
गाव व त्यापुढील किनारा असे चालत गेल्यास एक दिवसाची छान सहल होते. साहसाचाही आनंद मिळतो. किनाऱ्यावर खडकामध्ये अनेक समुद्री जीव आढळतात. कुडाळ-पाट-परूळे-भोगवे असेही जाता येते. आणि भोगव्याच्या किनाऱ्यावरून निवती किल्ल्यावर चढता येते. पाट येथे गावतळयामध्ये वेगवेगळया रंगाची कमळे आहेत. या विस्तीर्ण तळयाच्या पश्चिमेस दलदलीच्या ठिकाणी अनेक प्रकारचे पक्षी नेहमी दिसतात. निवतीच्या समुद्रात मोठ्या प्रमाणात अणि जवळून 'डॉल्फिन' माशाच्या झुंडी पाहाता येतात. डॉल्फिनचे नृत्य पाहाण्याचा आनंदही अनुभवता येतो. यांत्रिकी होड्यांमधून समुद्र सफर करत ' डॉल्फिन' चे नृत्य पाहाता येते. हे डॉल्फिन मोठ्या संख्येने येथे पाण्यावर येतात. यांत्रिकी पर्यटक होड्यांच्या जवळूनच त्यांचा जलविहार चालू असतो. उंच उड्या मारत जलविहार करणारे डॉल्फिन पाहाणे पर्यटकांसाठी पर्वणीच ठरते. पर्यटकांना आवश्यक त्या सुविधा असणारे बीच रिसॉर्टही येथे आहे.
Other Details
निवती बीच वेंगुर्ला आणि तारकर्ली-मालवणला कोस्टल हायवेने जोडलेले आहे. वेंगुर्ला बीचवरून, दक्षिणेकडील भागासह बस किंवा टॅक्सीने निवतीला जाण्यासाठी सहज जाता येते. मालवणहून वेंगुर्ल्यासाठी बसेस सुटतात पण कमी वारंवारतेने.
वेंगुर्ल्यापासून निवती बीचचे अंतर : कोस्टल हायवेने 27 किमी
मालवणपासून निवती बीचचे अंतर : कोस्टल हायवेने 26.5 किमी