सागरगड (खेडदूर्ग) किल्ला , अलिबाग - Sagargad fort Alibaug

मुंबईहून कोणत्याही ऋतूत एका दिवसात करण्यासारखा किल्ला म्हणजे सागरगड उर्फ खेडदूर्ग. अलिबागच्या समुद्र किनार्‍यावर आणि धरमतरच्या खाडीवर लक्ष ठेवण्यासाठी हा किल्ला बांधण्यात आला. छ. शिवाजी महाराजांसारख्या दुरदृष्टीच्या राजाने सागरी किनारपट्टीचे रक्षण करण्यासाठी खांदेरी, कुलाबा, सर्जेकोट या किल्ल्यांची निर्मिती करेपर्यंत सागरगडावरच अलिबाग पट्यातील समुद्र किनार्‍याच्या रक्षणाची भिस्त होती. या किल्ल्याचे नाव सागरगड असले तरी समुद्रकिनार्‍यापासून हा किल्ला ५ मैल दूर आहे. 

 इतिहास :
सागरगड कोणी व केव्हा बांधला हे अज्ञात आहे. इ.स १६६० शिवाजी महाराजांनी हा किल्ला आदिलशहाकडून जिंकून घेतला. त्यावेळी महाराजांनी गडावरुन खांदेरी - उं

ेरी ही बेटे पाहिली व इंग्रज व सिध्दी यांच्यावर वचक बसविण्यासाठी खांदेरी बेटावर किल्ला बांधण्याची योजना आखली. इ.स. १६६५ मध्ये शिवाजी राजांनी मोगलांबरोबर केलेल्या पुरंदरच्या तहात जे २३ किल्ले मोगलांना दिले त्यात सागरगडचा (खेडदूर्ग) समावेश होता. आग्र्‍याहून सुटका झाल्यावर महाराजांनी सागरगड पुन्हा स्वराज्यात आणला. 

 संभाजी महाराज च्य मृत्यूनंतर माजलेल्या अंदाधुंदीत सागरगड सिध्दीने ताब्यात घेतला. पण कान्होजी आंग्रे, कुलाब्याचे भिवाजी गुजर, आरमार प्रमुख सिधोजी यांनी १६९८ साली सिध्दीकडून किल्ला जिंकून घेतला. 

छत्रपती शाहू महाराज व ताराराणी यांच्या वादात कान्होजी आंग्रे ताराराणीच्या बाजूस होते. पण १७१३ मध्ये बाळजी विश्वनाथ पेशवे यांनी मुसद्देगिरीने छ. शाहू व कान्होजी आंग्रे यांच्यात समेट घडवून आणला. त्यावेळी १६ किल्ले कान्होजी आंग्रे यांच्या ताब्यात देण्यात आले. त्यात सागरगडचा समावेश होता. कान्होजी आंग्रे यांच्या मृत्यूनंतर सागरगडचा ताबा येसाजीकडे गेला. मानाजी आंग्रे व यसाजी आंग्रे या भावांच्या भांडणात पोर्तुगिजांनी मानाजीची बाजू घेतली, मानाजीने येसाजीचा पराभव केला. त्यावेळी सागरगडाचा ताबा त्यांच्याकडे आला. इ.स. १७३८ मध्ये संभाजी आंग्रेने सागरगड मानाजी कडून जिंकून घेतला. इ.स. १८१८ मध्ये हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला. इथला रम्य निसर्ग व अल्हाददायक वातावरण पाहून जनरल फूलर व काही इंग्रज अधिकार्‍यांनी येथे विश्रामधामे बांधली होती. 

 जेवणाची सोय :गडावर जेवणाची सोय नाही, परंतू सिध्देश्वर मठात चहा मिळू शकतो. 

पाण्याची सोय : गडावर पाण्याची सोय आहे.