भवानीगड किल्ला रत्नागिरी , संगमेश्वर

रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यात ‘‘भवानीगड‘‘ हा छोटासा डोंगरी किल्ला आहे. या किल्ल्यावर भवानीमातेचे प्रशस्त कौलारु मंदिर आहे. या मंदिरात आजही गावकर्‍यांची वर्दळ असते दरवर्षी दसर्‍याला गावकरी देवीला बकर्‍याचा बळी देतात.

इतिहास : भवानीगड किल्ल्याची उभारणी केंव्हा झाली हे ज्ञात नाही. पण किल्ल्यावरील टाक्यांची बांधणी पाहाता हा किल्ला १३१४ व्या शतकातील असावा. इ.स १६६१ मध्ये छ. शिवाजी महाराजांनी किल्ल्याची डागडूजी करुन भवानी मातेचे मंदिर बांधले. इ.स १८१८ मध्ये हा किल्ला ब्रिटीशांनी जिंकून घेतला.

जेवणाची सोय : गडावर जेवणाची सोय नाही. पण मुंबई - गोवा महामार्गावर अनेक हॉटेल्स आहे

.

पाण्याची सोय : गडावरील टाक्यात फेब्रुवारी - मार्चपर्यंत पिण्याचे पाणी असते.

जवळपास पाहण्यासाठी ठिकाणे:

महिमतगड , गोविन्द्गड , बालेश्वर मंदिर , संभाजी महाराज समाधी . कडवई या किल्ल्याच्या पायथ्याच्या गावातील म्हादगेवाडीतून कच्चा रस्ता किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत जातो. किल्ला चढायला सुरुवात केल्यानंतर थोड्याच वेळात गोसावीवाडी लागते. त्याच्या पुढच्या टप्प्यावर शिर्केवाडी लागते. शिर्केवाडीच्या पुढे थोड्याच अंतरावर पाऊलवाटेला दोन फाटे फुटतात. एक वाट सरळ जाते तर दुसरी वाट उजव्या बाजूस किल्ल्यावर जाते. या वाटेने खडा चढ चढून ५ मिनिटात आपण बालेकिल्ल्याखालील दगडात खोदलेल्या टाक्यांपाशी येतो या टाक्यांच्या खालच्या बाजूस अजून एक छोटे टाकं व भूयार आहे. हे पाहून थोडेसे मागे येऊन डाव्या बाजूने वर जाणार्‍या वाटेने गेल्यास आपण पूर्वाभिमुख उध्वस्त प्रवेशद्वारातून बालेकिल्ल्यावर प्रवेश करतो. बालेकिल्ल्यावर भवानीमातेचे प्रशस्त कौलारु मंदिर आहे. मंदिरात समोरच शिवाजी महाराजांची मूर्ती, उजव्या हाताला भवानी मातेची दगडात कोरलेली पूरातन मूर्ती याशिवाय दोन शिवलींग व दोन समाध्या आहेत. मंदिरात एक छोटी तोफ आहे. बालेकिल्ल्याची तटबंदी दगड एकमेकांवर रचून करण्यात आलेली आहे. भवानी मंदिराच्या मागच्या बाजूस बालेकिल्ल्याचा उत्तराभिमुख उध्वस्त दरवाजा आहे. या दरवाजातून बाहेर पडून समोर चालत गेल्यास किल्ल्याच्या दक्षिण टोकावर जाता येते. तर उजव्या बाजूच्या पायवाटेने खाली उतरल्यास दगडात खोदलेली पाण्याची तीन टाकं पाहाता येतात. या टाक्य़ांसमोर एक दगडी नंदी आहे. हे पाहून झाल्यावर गडफेरी पूर्ण होते.