Contact Us :
श्रीदेव वेतोबा मंदिर ,आरवली वेंगुर्ला | Vetoba Mandir , Aravali Vengurla
श्रीदेव वेतोबा मंदिर वेंगुर्लेपासून १२ कि.मी. अंतरावरील निसर्गरम्य अशा आरवली गावचे ग्रामदैवत श्रीदेव वेतोबा हे दक्षिण कोकणातील अत्यंत जागृत असे पुरातन देवस्थान आहे. श्री देव वेतोबा केवळ आरवली पंचक्रोशीत नव्हे तर उभ्या दक्षिण कोकणचा पालक, रक्षक आणि संकट निवारक म्हणून पिढ्यान पिढ्या भाविक जनतेचे श्रध्दास्थान आहे. संकटसमयी भक्ताच्या हाकेनुसार धावून येऊन संकट निवारण करणारा देव तसेच नवसाला पाहणारा देव अशी या श्रीदेव वेतोबाची ख्याती आहे. वेंगुर्ले-शिरोडा-रेडी रस्त्यावर आरवली येथे श्रीदेव वेतोबाचे पुरातन देवस्थान आहे. रस्त्यावरुनच श्रीदेव वेतोबाचे दर्शन घडते. मंदिराच्या गाभार्यात श्रीदेव भूमय्या, देवपूर्वस, श्री देव रामपुरुष, देव बाराचा ब्राह्मण, देव भावकाई या देवतांच
या पाषाण मूर्ती आहेत. वेतोबाची मूर्ती भव्य मानवाकृती आहे या द्विभुज मूर्तीच्या उजव्या हातात विक्रोश खड्ग असून डाव्या हातात कणीपात्र आहे. वेतोबाचे मंदिर प्रशस्त व दुमजली असून सुमारे दोन हजार लोक सहज बसू शकतील. वेतोबाला केळ्याच्या घडाचा नैवेद्य देतात तर भल्या मोठ्या चामड्याच्या चपलांच्या जोडांचा नवस बोलतात. श्री वेतोबाच्या वर्षातून दोनदा कार्तिक शुध्द १५ व मार्गशीर्ष पौर्णिमेस जत्रा होतात. श्री वेतोबास सालई झाडाच्या पानाचे ३३ प्रसाद लावण्याची वहिवाट आहे. योगी राज बापूमामा केणी महाराजांचे आरवलीच्या या श्रीदेव वेतोबास श्रीदेव विठ्ठल मानून भजत असत. आरवलीच्या वेतोबा देवस्थानात योगीराज बापूमामा केणी यांचा पाडवा नावाचा समारंभ ज्येष्ठ शुध्द प्रतिपादेस करतात. जेव्हा वेतोबा देवस्थानात काही अडचण किंवा संकट निर्माण होते तेव्हा बापू मामांना हाक मारुन त्यांचा अंधार उभा राहिल्यावर त्यांचा सल्ला घेतला जातो. श्रीदेव वेतोबाचे देवालय इ.स. १६६० मध्ये बांधण्यात आले. या देवालयाचा सभामंडप सुमारे इ.स. १८९२ ते १९०० च्या दरम्यान बांधला गेला. श्रीदेव वेतोबाचे देवालयाचा नगारखाना तीन मजल्यांचा आहे. तर देवालय दुमजली आहे.
श्री देव वेतोबा मंदीर, आरवली वेंगुर्ला
वेंगुर्ला तालुक्यात आरवली गावात वेतोबाचे प्रसिद्ध मंदिर आहे.वेतोबाला नवसाला केळीचा घड दिला जातो.गावात लोक मानतात कि वेतोबा हा पूर्ण गावभर फिरत असतो.त्यामुळे त्याची जोडे झिजतात.त्यामुळे वेतोबाला जोडे दिले जातात.
वेताळ या शब्दातील महात्म्यसुद्धा अर्थपूर्ण आहे. या शब्दातील पहिले अक्षर वेगळे काढले तर उरतो ‘ताळ’, दुसरे अक्षर वेगळे काढले तर उरतो ‘वेळ’, तिसरे अक्षर बाजूला काढले तर उरतो ‘वेता’, ‘वेता’ म्हणजे वेत व अर्थातच वेताने वेळेवर ताळ्यावर आणणारी शक्ती म्हणजे वेताळ.
या वेताळामध्ये भूताखेतांना व अपप्रवृत्तींच्या शक्तींना विरोध करण्याची शक्ती असते. या शक्तीचे स्वरूप अत्यंत प्रभावी परिवर्तनशील असते. यामुळेच आरवलीतील या देवस्थानची ख्याती सर्वदूर पसरली आहे.
आरवली येथील श्री वेतोबाचे मंदिर हे मूलत: वेताळाचे मंदिर आहे. आपल्याकडे ‘बा’ हा शब्द आदरार्थी वापरला जातो. गुजरातमध्ये आईला ‘बा’ म्हणण्याची पद्धत आहे. वेताळ या शब्दातील ‘ळ’ हा शब्द जाऊन आदरार्थी ‘बा’ हा शब्द आला व त्यामुळे आरवलीतील हे देवस्थान ‘श्री वेतोबा’ या नावाने रूढ झाले.
दीड ते दोन फूट लांबीच्या चपला पायात सरकवल्या जातात आणि वेतोबा नगर प्रदक्षिणेसाठी बाहेर पडतो. त्याच्यासमोर सा -या शक्ती नतमस्तक होतात. काळी शक्तीही त्याच्या समोर टिकाव धरू शकत नाही. ज्या-ज्या वेळी संकटांचे तांडव सुरू होते. तेव्हा वेतोबाचे नुसते स्मरण करावे.
म्हणजे संकटे आपला मार्ग मोकळा करतात. वेतोबा सातत्याने भ्रमंती करतच असतो. त्यामुळे चप्पल झिजतात अशी धारणा आहे आणि त्यांच्या श्रद्धेला वेतोबा कसूरही ठेवत नाही असे म्हणतात, भक्तांच्या रक्षणासाठी वेतोबा सातत्याने भ्रमंती करतच असतो. तो भक्तांची काळजी घेतो.
म्हणून भक्त त्याचा त्रास हलका करण्यासाठी त्याच्या पायात चपला सरकवतात. आरवली वेतोबाकडे गेल्यावर लाखो चपलांच्या जोडांचा ढीग दिसतो. केळयाचे घड लक्ष वेधून घेतात. कोकणातल्या श्रद्धेचा आणि निसर्गप्रेरणेचे हे एक भक्कम श्रद्धास्थान आहे.