सोंडाई किल्ला कर्जत - Sondai Killa , Karjat

मुंबई - पुणे मार्गावरील कर्जत हे अनेक भटक्यांचे (ट्रेकर्सचे) आवडते गाव आहे. या गावाच्या आजूबाजूच्या असलेल्या राजमाची, पेठ, सोनगिर, पेब, भिवगड, ढाक आणि भिमाशंकर या किल्ल्यांवर भटकून अनेक जणांनी आपल्या भटकंतीची सुरवात केलेली आहे. याच कर्जतच्या जवळ "सोंडाई" नावाचा एक छोटा अपरीचित किल्ला आहे. या किल्ल्याचा विस्तार पहाता याचा उपयोग टेहळणीसाठी होत असावा.

माथेरानच्या डोंगराच्या सानिध्यात असलेल्या या किल्ल्यावर फारसे अवशेष नाहीत, पण हा ट्रेक येथील निसर्ग सौंदर्यामूळे अल्हाददायक व किल्ल्यावरील १५ फूटाच्या कातळ टप्प्यामूळे थरारक होतो.

जेवणाची सोय : गडावर जेवणाची सोय नाही, पण कर्जत गावात जेवणाची सोय होऊ शकेल.

पाण्याची

सोय : गडावर पिण्याच्या पाण्याची सोय आहे.

राहण्यासाठी खोल्या :
गडावर रहाण्याची सोय नाही, पण वावर्ले ठाकरवाडीतील व सोंडेवाडीतील शाळेत रहाण्याची सोय होते.

जवळपास पाहण्यासाठी ठिकाणे:

सोंडेवाडी व वावर्ले ही दोन किल्ल्याच्या पायथ्याची गाव आहेत. सोंडेवाडी गाव किल्ल्याच्या पाव (१/४) उंचीवर वसलेल आहे. या गावातून मळलेली वाट किल्ल्यावर जाते. या वाटेने १५ मिनिटात आपण एका पठारावर पोहोचतो. या ठिकाणी वावर्ले गावातून येणारी वाट येऊन मिळते. येथून गडमाथ्यावर दोन झेंडे लावलेले दिसतात.(त्यापैकी कातळकड्याच्या टोकाला लावलेल्या झेंड्याच्या खाली गडमाथ्यावर जाण्यासाठी शिडी आहे हि गोष्ट ध्यानात ठेवावी.) पुढे वाटेत कातळात खोदलेल्या काही पायर्‍या लागतात. किल्ल्याचा डोंगर प्रथंम उजव्या बाजूला व नंतर डाव्या बाजूला ठेवत आपण डोंगरसोंडे वरून दुसर्‍या पठारावर पोहोचतो. या ठिकाणी पोहोचण्यासाठी सोंडेवाडीतून पाऊण तास लागतो. येथे कातळात खोदलेली दोन पाण्याची जोडटाकं आहेत. या टाक्यांत १२ महीने पाणी असते. उन्हाळ्यात मात्र टाक्यातील पाणी काढण्यासाठी दोरी लागते. या ठिकाणाहून सोंडाईच्या शेजारील गव्हारी/ गवारी नावाचा सोंडाई पेक्षा उंच डोंगर दिसतो. या डोंगरावर मुख्य डोंगरापासून वेगळा उभा असलेला खडक आपले लक्ष वेधून घेतो. पठाराच्या वरच्या बाजूस कातळात खोदलेल्या पायर्‍या आहेत. त्या चढून गेल्यावर डाव्या बाजूस एक सुकलेल टाक आहे, तर उजव्या बाजूला गड माथ्यावर जाण्यासाठी बांबूची शिडी आहे. येथून पुढचा टप्पा चढतांना आपली पादत्राणे काढून वर जावे लागते. (गडावर सोंडाई देवीचे स्थान असल्यामूळे हा गावकर्‍यांच्या श्रध्देचा भाग आहे आणि आपण याचा मान ठेवावा.) या ठिकाणी कातळटप्पा चढण्यासाठी कातळात व्यवस्थित खोबणी बनवलेल्या आहेत. त्यांचा वापर करून किंवा शिडीने हा १५ फूटी कातळकडा सहज चढता येतो. कातळकडा चढून वर आल्यावर उजव्या बाजूस २ पाण्याची टाकी आहेत. त्यातील पहिल टाक मोठ असून त्यात २ दगडी खांब कोरलेले आहेत. या खांबटाक्यातील पाणी पिण्यायोग्य नाही. दुसर टाक लहान आहे. गडमाथा छोटासा आहे. येथे एका झाडाखाली दोन दगडात कोरलेल्या मूर्त्या ठेवलेल्या आहेत. त्यापैकी एक मूर्ती सोंडाई देवीची आहे. गडमाथ्यावरून माथेरानचा डोंगर, मोरबे धरण, वावर्ले धरण व आजूबाजूचा विस्तिर्ण परिसर दिसतो.