Contact Us :
बाणकोट किल्ला रत्नागिरी , बाणकोट मंडणगड
मंडणगड तालुक्यातील बाणकोट हे लहानसे गाव. रत्नागिरी जिल्ह्याच्या उत्तरेस रायगड-रत्नागिरी जिल्ह्याच्या सीमेवर सावित्री नदीच्या उगमस्थानावर हे गाव आहे. त्यामुळे इथला निसर्गरम्य परिसर भुरळ पाडणारा आहे. गावाच्या एका बाजूला उंचावर बाणकोट किल्ला उभा आहे.
पोर्तुगिजांकडून मराठ्यांकडे आल्यावर या किल्ल्याला 'हिंमतगड' नाव देण्यात आले. इंग्रजांनी किल्ला आंग्र्यांकडून ताब्यात घेतल्यावर त्यास 'व्हिक्टोरिया' असे नाव दिले. कमांडर जेम्स याने १७५५ मध्ये किल्ला ताब्यात घेतल्यावर परिसरातील ९ गावे इंग्रजांच्या ताब्यात गेली. ब्रिटीशांच्या काळात बाणकोटला व्यापार आणि भौगोलिक स्थानामुळे राजकीय महत्त्व प्राप्त झाले आणि ते जिल्हा कचेरीचे मुख्य स्थान झा
े. मात्र दळणवळणाच्या गैरसोयींमुळे नंतरच्या काळात जिल्हा कचेरी रत्नागिरीस आणली गेली.
लाल पाषाणाच्या टेकडीवर बांधलेल्या या किल्ल्याची तटबंदी अजूनही चांगल्या स्थितीत असून समुद्राच्या बाजूने असलेले भव्य प्रवेशद्वार नजरेत भरते. प्रवेशद्वाराजवळ उभे राहिल्यास समोर खाडीच्या पलिकडे हरिहरेश्वराचा डोंगर दिसतो. किल्ल्यावरून अथांग समुद्राचे दर्शन घडते. किल्ल्यावर पहारेकऱ्यांच्या देवड्या, पाण्याचे हौद, भुयार आणि विविध भागांना जोडणारे जिने पाहायला मिळतात. किल्ल्याच्या पश्चिमेकडे असलेल्या तटबंदीस लागून खंदक आहे. खालच्या बाजूस बांधलेले 'ऑर्थर सीट' किल्ल्यावरून स्पष्ट दिसते.
हे स्मारक १७९१ मध्ये पुण्याचा रेसिडेंट असलेल्या चार्ल्स मॅलेट याचा मुलगा आर्थर मॅलेट महाबळेश्वरला जात असतांना तो मुंबईहून बोटीने बाणकोटकडे निघाला. त्याची पत्नी सोफीया आणि ३२ दिवसांची मुलगी एलेन या दोघी १३ खलाशांसह बाणकोटच्या खाडीत बुडून मरण पावल्या. त्यांच्या पार्थिव शरीराचा दफनविधी किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या स्मशानभूमीत करण्यात आला. या ठिकाणी चौथरा बांधण्यात आला आहे. यास 'ऑर्थर सीट' म्हणून ओळखले जाते. महाबळेश्वरच्या प्रसिद्ध 'आर्थर सीन' पॉईंटचे नाव याच आर्थर वरून देण्यात आले आहे.
नाना फडणवीस यांचे गाव वेळास किल्ल्यापासून काही अंतरावरच आहे. गावात त्यांनी बांधलेली दोन देवालये पाहायला मिळतात. हिवाळ्यात निसर्गमित्रांनी कासवांचे संवर्धन करण्यासाठी भरवलेल्या कासव महोत्सवातही सहभागी होता येते. समुद्र किनाऱ्याची भटकंती आणि इतिहासाच्या पाऊलखुणा अभ्यासतांना वेगळेच समाधान मिळते. म्हणूनच ही भेट स्मरणीय ठरते.
जवळपास पाहण्यासाठी ठिकाणे:
गडाच्या पायथ्याशी गणपती मंदिर आहे. गडाला सर्व बाजुंनी जांभ्या दगडात खोदुन काढलेला खंदक आहे. गडाचा दरवाजा उत्तराभिमुख असुन सुंदर दगडी महिरपींनी सुशोभित केलेला आहे. प्रवेशव्दाराच्या आतील बाजूस पहारेकर्यांसाठी देवडया आहेत. उजव्या बाजूच्या देवडीत ६ पाण्याचे हौद आहेत. तिथुन पुढे गेल्यावर नगारखान्यात जाण्यासाठी डाव्या हाताला सुबक जीना आहे. त्यावरून वर गेल्यावर सावित्री नदी व सागराचा संगम आणि आजुबजुचा प्रदेश आपल्या दृष्टीक्षेपात येतो. किल्ल्याच्या तटावर जाण्यासाठी पूर्व-पश्चिम बाजूस २ जीने आहेत. पश्चिमेकडील दरवाजाने तटाबाहेरील बुरूजावर जाता येते. हया बुरूजात खोल विहीर आहे ,ती आता बुजलेली आहे. पश्चिमेकडे बुरूजातच पहारेकर्यांसाठी खोली आहे. हया पाण्याच्या बुरूजात चोर दरवाजा आहे. बाणकोटहून वेळासकडे जाताना वाटेत "पाणबुरूज" किंवा मधला बूरूज लागतो. मुळ किल्ल्याला बळकटी आणण्यासाठी सिध्दीने हा बुरूज बांधला.
Other Details
कसे जावे :
मुंबईहून येताना मंडणगड तालुक्यापासून रत्नागिरी जिल्ह्यात निसर्गाच्या सान्निध्यातील भटकंतीची सुरुवात करता येते. मुंबई-गोवा महामार्गावर म्हाप्रळ पासून १८ किलोमीटर अंतरावर मंडणगड आहे. मंडणगडपासून बाणकोट २५ किलोमीटर अंतरावर आहे. रायगड जिल्ह्यातील श्रीक्षेत्र हरिहरेश्वरला भेट देऊन रत्नागिरी जिल्ह्यात प्रवेश करायचा असल्यास केवळ ४ किलोमीटर अंतरावर असलेल्या बागमंडला गावाला लागून असलेल्या बाणकोटच्या खाडीत फेरीबोटची सुविधा आहे. आपल्या वाहनासह या बोटीतून प्रवास करतांना केवळ पाच मिनिटात मंडणगड तालुक्यातील वेसवी गावात प्रवेश करता येतो. वेसवीपासून बाणकोटचा किल्ला ३ किलोमीटर अंतरावर आहे.
विमान:
रेल्वे :
बस: