शिरोडा मिठागर सिंधुदुर्ग , शिरोडा वेंगुर्ला | Shiroda Mithagar , Shiroda vengurla

हिरव्यागर्द वनश्रीने नटलेले, माड-पोफळीच्या बागांनी बहरलेले, सुंदर समुद्रकिनारा लाभलेले अत्यंत विनोभनीय गाव शिरोडा!

शिरोड्यापासून गोवा अवघ्या ७ कि.मी. अंतरावर आहे. शिरोड्याला लांबच लांब पसरलेली पांढर्‍या शुभ्र वाळूची सुंदर, रम्य चौपाटी लाभलेली आहे. या चौपाटीलगतच असलेले भल्यामोठ्या सुरुच्या वृक्षांचे बन हे तर शिरोड्याचे एक खास वैभव आणि आगळे वैशिष्टयही आहे. साहित्यातील ज्ञानपीठ हा सर्वोच्च पुरस्कार मिळविलेले प्रतिभावंत साहित्यिक वि.स. तथा भाऊसाहेब खांडेकर ह्यांची ही प्रेरणाभूमी आणि कर्मभूमीही! भाऊसाहेब खांडेकरांनी येथील ट्युटोरिअल हायस्कूलमध्ये शिक्षकाची नोकरी केली आणि प्रारंभीच्या उत्तमोत्तम कादंबर्‍याचे लेखनही. असे हे शिरोडा सामाजिक, सांस्

ृतिक, साहित्यिक, ऐतिहासिक परंपरा व पार्श्वभूमी लाभलेले गाव आहे.

भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामात शिरोडा गावचे महत्त्वही फार आहे. १९३० साली शिरोडा येथे झालेल्या ऐतिहासिक मिठाच्या सत्याग्रहामुळे भारताच्या स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासात शिरोडा गावाचे नाव अग्रक्रमाने नमूद झालेले आहे.

सिंधुदुर्गात पूर्वी मालवण, मिठबाव आदी भागात उत्पादन व्हायचे. आज तेथील मिठागरे बंद पडली आहेत. शिरोडा या एकमेव गावात सध्या मीठ बनविले जाते. गांधीनगर भागातील सुमारे ८७ एकर क्षेत्रात मीठ तयार होते. या भागात देवी माऊली देवस्थान, गणेशप्रसाद, भास्कर, नारायण प्रसाद, मोरो भीमाजी, सकबा सबनीस अशी सहा खाजगी मिठागरे आहे. नवारदेसाई, दादासाहेब, जुनादेसाई, दुर्गाबाई, सातोराम, विठोजी रामाचा, वडाचा मिठागर (ज्या ठिकाणी १९३० मध्ये मीठ सत्याग्रह झाला होता.) असे पाच केंद्र सरकारच्या मालकीचे मिठागर मिळून एकूण अकरा मिठागरांमध्ये मीठ बनविले जाते. मीठ तयार होण्यास फेब्रुवारी मध्यापासून सुरुवात होते. या हंगामात मे अखेरपर्यंत चालतो. वर्षाकाठी सुमारे अडीच हजार टन मीठ उत्पादन होते. या मिठागरांमधून पांढरे व काळे मीठ असे दोन प्रकारचे मीठ तयार केले जाते. काळे मीठ हे प्रामुख्याने आंबा कलमे, नारळीच्या झाडांना खतासाठी वापरले जाते.