Contact Us :
लाकडी हस्तकला , सावंतवाडी | Wooden Crafts , SAWANTWADI
कोकण म्हणताच आपल्या डोळ्यांसमोर येते ती घनदाट झाडी, निळाशार समुद्र आणि अतिशय सुंदर निसर्ग… कोकण हा त्याच्या निसर्गासाठी जितका प्रसिद्ध आहे तितकाच तो गोड आणि रसाळ हापूस आंब्यासाठीही प्रसिद्ध आहे. या आंब्याची ख्याती देशभर पसरलेली आहे. त्यामुळे कोकण आणि आंबा हे एक समीकरणच बनलं आहे. तसंच मांसाहरी खवय्यांनाही कोकण खूप आवडतो. कारण इथे मिळणारी ताजी ताजी मासोळी… अनेक लोक तर केवळ मच्छीवर यथेच्छ ताव मारण्यासाठी कोकणात जातात.
कोकण त्याच्या खाद्यपदार्थांसाठी जितकं फेमस आहे तितकंच आणखी एका कारणासाठी आहे. कोकणातील सावंतवाडी या शहरात लाकडी वस्तू या खूप चांगल्या आणि वाजवी दरात मिळतात.
सावंतवाडी म्हणजेच 'सुंदरवाडी' या शहरावर न
सर्गाने मुक्त हस्ताने उधळण केली. या शहरात राजवाडा, लाकडी फळे, फुले (हस्तकला), मोती तलाव, नरेंद्र डोंगर, जगन्नथराव भोसले उद्यान, आत्मेश्वर तळी, व शिल्पग्राम आदी माध्यमातून येथे येणारे पर्यटक अधिक स्थिरावतात. 'सावंतवाडी' हे शहर संस्थान काळातील खेमसावंत-भोसल्यांची राजधानी होती. सावंतवाडीतील 'चितार आळी' हा भाग कलाकुसरीच्या वस्तूंच्या दुकांनांनी गजबजलेला असतो. सध्या सावंतवाडी हे राज्यातील लाकडी कलाकुसरीच्या वस्तु व हस्तकला उद्योगाचे प्रमुख केंद्र म्हणून ओळखले जाते. लाकडी खेळणी, लाखेच्या वस्तू, बाहुल्या, रंगीत फळे, रंगीत पाट, दरवाजांना लावण्याच्या विविधरंगी माळा, शोभेच्या गृहवस्तू उत्कृष्टपणे तयार केल्या जातात.
सावंतवाडी येथे पारंपरिक हस्तकला कौशल्याच्या वस्तूंचे कायमस्वरूपी प्रदर्शन येथे उभारण्यात आलेले आहे. या शिल्पग्रामात विविध कलात्मक वस्तूंची विक्री केली जाते. गेल्या तीन शतकांहून अधिक काळ सावंतवाडी हे लाकडी रंगीत खेळण्यांसाठी प्रसिध्द आहे. लाकडी फळे, गंजिफा व लाखेच्या वस्तू यांच्या निर्मितीचेही येथे परंपरागत केंद्र आहे.
सावंतवाडीतील लाकडाच्या वस्तू या केवळ भारतातच नाही तर जगभर प्रसिद्ध आहेत. त्यामुळे इथे केवळ लाकडांच्या वस्तू खरेदी करण्यासाठी येणार्या लोकांची संख्या खूप असते. वेगवेगळी कलाकुसर केलेल्या लाकडी वस्तू तसंच वेगवेगळ्या प्रकारची लहान मुलांची खेळणी इथे मिळतात. ही खेळणी तर लहान मुलांचं लक्ष अगदी पटकन आकर्षून घेतात. भातुकलीच्या खेळांपासून ते लाकडाची रेल्वे, बाहुल्या अशाप्रकारची विविध प्रकारची खेळणी इथे मिळतात. हे सावंतवाडीचं लाकडी वस्तुंचं मार्केट जवळ-जवळ शंभर वर्षांपूर्वीचं आहे. त्या काळातील राजे शिवराम राजे भोसले यांनी तिथल्या नागरिकांना आर्थिक मदत म्हणून लाकडी वस्तू बनवण्याचे छोटे छोटे कारखाने उभारले आणि त्यांना रोजगार उपलब्ध करून दिला. स्थानिक नागरिकांच्या रोजगारासाठी उभं केलेलं हे मार्केट आज जागतिक दर्जाची बाजारपेठ झालीये.
या बाजारपेठेचं वैशिष्ट्य म्हणजे या बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे लाकडी खुळखुळे, लाकडी गाड्या, लाकडाचे वेगवेगळ्या प्रकारचे भोवरे, लाकडाच्या बॅटस् अशी लाकडाची खेळणी मिळतात… लाकडी बैलगाड्या, लाकडी शोभेची घरं तसंच शोभेची फळं, स्वयंपाकघरात लागणार्या लाकडाच्या वस्तू, मुलींसाठी लाकडी बांगड्या अशा सार्या लाकडापासून तयार केलेल्या वस्तू इथे मिळतात. तसंच इथे अतिशय सुंदर कुंड्याही मिळतात आणि विशेष म्हणजे या कुंड्या फोल्डही होतात. त्यामुळे त्या कमी जागा व्यापत असल्याने तुम्ही आरामात गाड्यांमधून दूर घेऊन येऊ शकता.
पंधरा रुपयांपासून ते अगदी पंधरा हजार रुपयापर्यंतच्या लाकडी वस्तू या बाजारात मिळतात. त्यामुळे लाकडाच्या वस्तुंची खरेदी करण्यासाठी एकदा तरी सावंतवाडीला जाऊन या बाजाराला नक्कीच भेट द्या.