कनकेश्वर मंदिर ,पाफ्तरपाडा | Kankeshwar mandir - Alibag



अलिबाग पासून सुमारे १३ कि. मी. अंतरावर, शहराच्या इशान्य दिशेला श्री कनकेश्वरचा ९०० फूट उंचीचा डोंगर आहे. समुद्रसपाटीपासून देवस्थानाची उंची साधारण १२७५ फूट इतकी होईल.

श्री कनकेश्वराला जाण्यासाठी दोन मार्ग आहेत, एक आहे मापगांव मार्गे व दुसरा आहे झिराड मार्गे.

नगमोडी वळणाने पायर्‍यांवरुन चालताना जवळपास ५००० फूट गड चढावा लागतो. पायथ्याशी असलेल्या दत्तमंदिरापासून चढण्यास सुरुवात केल्यावर साधारण १००० फूट अंतर पार केल्यावर उजव्या बाजूस 'मोहनगिरी' व 'बालगिरी' या दोन तपस्व्यांच्या समाध्या आहेत. येथुन साधारण ५०० फूटावर 'नागोबाचा टप्पा' आहे, येथुन ७५० फूटावर 'जांभळीचा टेप' लागतो, पुढे साधारण

१०० फूटावर एक पायरी लागते त्यास ’’ देवाची पायरी ’’ असे म्हणतात. नीट निरीक्षण केल्यास या पायरीवर संपुर्ण पावलाचा ठसा दिसतो. या नंतर गायमांडी लागते व येथुन सपाटीचा रस्ता चालु होतो, दक्षिणेकडे सागरगडचा डोंगर व पश्चिमेकडे अरबी समुद्राचे विहंगम दृष्य दिसते. गायमांडीच्या पुढे 'पालेश्वर' हे घुमटीवजा शिवमंदिर आहे. त्याच्या पुढे गेल्यावर 'ब्रम्हकुंड' लागते, शेजारीच मारुती मंदिर आहे, उजव्या हाताला बलराम कृष्ण मंदिर आहे. पुढे अष्टकोनी पुष्करणी असुन त्याच्या पश्चिमेस श्री शंकराचे भव्य मंदिर आहे. देवळाचे बांधकाम यादव घराण्यातील राजे रामदेव यांच्या कारकिर्दीत झाले आहे. श्री कनकेश्वर मंदिराची उंची ५४ फूट आहे. श्री कनकेश्वर हे एक प्राचीन स्वयंभू शिवस्थान आहे.