परशुराम मंदिर ,चिपळूण

कोकण ! अप्रतिम निसर्ग सौंदर्याने नटलेला प्रदेश. कोकण प्रदेशाची निर्मितीच्या कथाही तेवढय़ाच रंजक. असं म्हणतात की कोकणाच्या भुप्रदेशाची निर्मिती परशुरामाने समुद्र ४०० योजने मागे हटवून केली आहे. म्हणूनच परशुरामाला सप्त कोकणाचा देव म्हणतात. संपूर्ण भारतात समुद्रालगतच्या राज्यांमध्ये परशुरामाची ही कथा सांगितली आणि ऐकली जाते. त्यामुळे संपूर्ण भारतभर परशुराम क्षेत्रे आहेत. 

    केरळची भुमी परशुरामाने निर्माण केली असे सांगत. तिथेही एक परशुराम क्षेत्र आहे. ओरिसा, आसाम, गुजरात आणि पंजाबमध्येही परशुराम क्षेत्र आहे. तसेच ते कोकणातही आहे. परशुराम हा अमर्त्य किंवा चिरंजीव मानला गेला आहे. त्यामुळे त्याचा कायम निवास असतो असा समज आहे. महाराष्ट्रात

िपळूणपासून ४ कि.मी. अंतरावर मुंबई-गोवा हायवेवर एक हजार फुट उंचीचा डोंगर आहे. ह्याला महेंद्रगिरी असे नाव आहे. परशुरामाच्या मंदिरामुळे लगतच्या गावालाही परशुराम असेच म्हणतात.  

मंदिराच्या रचनेमध्ये मुगल वास्तुकलेचा प्रभाव स्पष्टपणे जाणवतो. विशेषत: मंदिराचे घुमट बघतांना ते प्रकर्षाने जाणवते. या मंदिराचे घुमट सरळ उतार असलेले अष्टकोनाकृती आहे. आणि उंच कळस तसेच मंदिरातल्या शिल्पकृती हे मिश्रण स्पष्टपणे दाखवतात. उपलब्ध पुराव्यानुसार इथला तिसरा घुमट हा आदिलशहाच्या बेगमांपैकी एकीने उभारला आहे. यामागे एक कथाही सांगितली जाते ही अशी,एकदा या बेगमेची ताटवे समुद्रात बुडाली होती. या बेगमेला समुद्राचा देव म्हणून परशुराम माहिती होता. तिने नवस बोलला की ताटवे परत आल्यास देऊळ बांधीन, त्यानंतर तिची ताटवे खरंच सुखरुपपणे किना-याला लागली आणि परशुरामाचे मंदिर बांधून तिने नवस फेडला. 

  या मंदिरामध्ये काळ, काम आणि परशुराम यांच्या मुर्ती आहेत. मध्यभागी असलेली परशुरामाची मुर्ती इतर दोन मुर्त्यांपेक्षा उंच आहे. मंदिरातली लाकडावर केलेली कलाकुसर सुरेख आहे, मंदिराचा वार्षिक उत्सव म्हणजे परशुरामाचा जन्मोत्सव. अक्षयतृतियेपासून सुरु होणारा हा उत्सव पुढे तीन दिवस चालतो. यावेळेस मंदिराचा परिसर सुशोभित करण्यात येतो. परशुरामाच्या जन्मोत्सानिमित्त किर्तन, भजनाचे कार्यक्रम आखले जातात. या मंदिरात महाशिवरात्रीही मोठय़ा उत्साहात साजरी केली जाते. याशिवाय परिसरातल्या वारकर्यांची अशी श्रध्दा आहे की, मार्गशिष एकादशीला प्रत्यक्ष विठ्ठल पंढरपूरहून महेंद्रगडवर येतो. त्यामुळे मार्गशिष एकादशीला इथे मोठी यात्रा भरते. परिसरातले वारकरी त्यादिवशी इथे दर्शनाला येतात. कोकणचा सर्वांग सुंदर निसर्ग, दुरवर दिसणारी कौलारु घरांची चित्रमय रचना असलेली गावं या सुंदर देखाव्याच्या पाश्वभुमीवर स्वाभिमानाची, निर्मोही वृत्तीची चिरंतर प्रेरणा देणार परशुरामाचे मंदिर. खरोखर एकदा तरी बघाव असेच.