दाभोळ समुद्रकिनारा रत्नागिरी ,दाभोळ

दाभोळ - इतिहासकालीन वैभवसंपन्न प्राचीन बंदर

प्राचीनकाळी दालभ्य ऋषींच्या नावावरून यास दाभोळ नाव पडले असे मानले जाते.

दापोलीकडून दाभोळ गावात प्रवेश करताना सडयावरून खाली दीसणारं दृश्य पाहून कुणाही रसिकाला वेड लागेल. चिपळूणकडील येणारी वाशिष्ठी नदी, पलीकडील डोंगरावरचा गोपाळगड किल्ला आणि टाळकेश्वरच्या देवळाचे शिखर, दाभोळकडील बाजूचे मशिदीचे मिनार, शिळावरचे मारूती मंदिर, समुद्र किना-याला लागून वाढलेले सुरूचे दाट बन आणि खाडीच्या किनारपट्टीत वाढलेले उंच माड, आपल्या हिरव्यागार झावळयांचा गुच्छ करून वा-याच्या झुळकीने येणा-यांचे स्वागत, आणि जाणारांना निरोप देताना दिसतात. सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी ता ही शोभा अवर्णनीय असते. कोकणातल्या समुद्

काठच्या कुठल्याही खेडयात साधारणत: असेच वातारण असते पण दाभोळच्या या पार्श्वभूमीला, प्रचंड घडामोडींच्या इतिहासाचा रक्तरंचित गूढ पडदा आहे. भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर दाभोळइतके जुने आणि प्रसिद्ध बंदर नव्हते. टॉलेमीच्या सर्वात जुन्या नकाशात दाभोळचा उल्लेख आहे. दाभोळ प्राचीन काळी दालभ्यवती होती, महिकावती होती. नंतर ती हामजाबाद होती. मैमुनाबादही एक वेळ दाभोळचे नाव होते. दक्षिण भारतातील बहुसंख्य मुसलमान यात्रेकरू मक्केला जाण्यासाठी दाभोळ बंदारात येत असत. त्यामुळे दाभोळला बाबुलहिंद म्हणजे मक्केचा दरवाजा असेही म्हणतात.

इथला तलम वस्त्रांचा व्यापार मोठा होता. अत्यंत कसबी कारागीर येथे वस्र विणत असत. अगदी 100 वर्षांपूर्वीपर्यत इथला साळीवाडा गजबजलेला होता आणि धोटयांचा लयबद्ध ठोक्यांवर इथे सुदर वस्रे विणली जात होती. शिवशाहीतील आरमारांत येथील भंडारी समाजाचे प्रभुत्व होते. या प्रचंड इतिहासाच्या खाणाखुणा येथील किनारपट्टीत, डोंगरांवर, सपाटीवर सर्वत्र दिसून येतात. दाभोळ गावात पडझड झालेल्या इमारती रस्तोरस्ती, डोंगरकपारीतून दिसतील. तेराव्या शतकापर्यंतचा दाभोळचा इतिहास चौल, शिलाहार आणि अशाच हिंदू राजवटीचा इतिहास आहे. मात्र पश्चिम पट्टीवरील या सुरक्षित बंदराची माहिती परदेशीयांना झाली, आणि या बंदरात समुद्रमार्गे पोर्तुगीज, डच, हबशी, तुर्के, इराणी यांची सतत आक्रमणे होत राहिली. तेराव्या शतकाच्या मध्यापासून तर सोळाव्या शतकाच्या अखेरीपर्यंत जवळपास 300 वर्षांपासून अधिक काळ मूसलमानी सत्तांचा अंमल दाभोळवर राहिला होता. त्यातील काहींनी इथल्या स्थानिक जनतेला त्रास दिला. तर काहींनी आपल्या सत्तेत आणि कारभारात येथील लोकांना सामावून घेऊन सुखाचा राज्यकारभार केला. येथील मुसलमान सत्तांना बाहेरच्या तुर्की, हबशी, शिया, मुसलमानांशी युद्धे करावी लागली आणि त्यामुळे दाभोळच्या बहुसंख्य भागात कबरीच कबरी जिकडेतिकडे बघायला मिळतात. त्यात पश्चिमेच्या बाजूला समुद्रकिनारी आणि डोंगरावर शिया मुसलमानांची असंख्य थडगी दिसतात. काळाच्या ओघात शिया मुसलमानांची इथे कत्तल झाली वा ते इथून गेले. व् शतकांच्या या प्रदीर्घ कालखंडात ज्यांनी चांगला कारभार केला, लढाईत जे शहिद झाले, त्याची गणना साधु-संतांत झाली, ते पीर झाले, त्यांचे दर्गे बांधण्यात आले. प्रतिवर्षी या पिरांचे भक्तगणांत हिंदू समाजही सामील आहे.

दाभोळ परिसरातील देर्दे हद्दीत (बंदरातून नदीच्या दिशेली उंच टेकडीवर) असलेला अमीरुद्दीन बालापीर (बला म्हणजे उंच ठिकाण) हा हिंदु-मुसलमानांत विशेषत: दर्यावर्दी समाजात अत्यंत आदराचे स्थान असलेला पीर समुद्रसपाटीपासून आठशे फूट उंचीवर आहे. दाभोळच्या गोडाऊनजवळ शेख फरीद, खडपकर वाडीसमोर खाडीत पानी पीर, बोरीबंदरात असलेला शहानवाल पीर, वणकर मोहल्ल्यातला कमालशाली पीर, दर्वेश यांच्या बागेतला हाजी सुलेमान पीर, हॉस्पीटलजवळचा कतलशेख पीर गावात आहेत. तर ओणनवसेच्या हद्दीवरचा खाजा खिजीर आणि वणौशीचे डोंगरावरचा जहाँबाज पीर हे गावाच्या सरहद्दीवर आहेत. परंतु दाभोळ गावातला सर्वांत प्रसिद्ध पीर म्हणजे आझमखान पीर. या पीराला इ.स. 1874 सालात ब्रिटीश सरकारने दिलेली 18 रूपयांची सनद आजही चालू असून या दर्ग्याचे पुजारी इनुस मुजावर यांना ती मिळते.

बालापीरला ही इ.स. 1870 पासून 30 रूपयांची सनद असून ती परंपरेने नवसे येथिल मुजावर घराण्याला मिळते. आझमखान पीर हे ठिकाण दाभोळच्या मध्यभागी एका डोंगराच्या पायथ्याशी आहे. निसर्गाच्या कुशीतील अत्यंत शांत ठिकाणी झाडीमध्ये हा दर्गा आहे. याच्या आजूबाजूला असलेल्या लहान-मोठया असंख्य कबरी आणि तेथील नीरव शांतता गूढ वाटते व मन अंतर्मुख करते. विशेषत: आझमखानांच्या भव्य कबरीजवळ उभे राहिले की, इथे काही प्रचंड इतिहास घडला असावा. याचा सहज साक्षात्कार होतो. जुन्या हस्तालिखित आझामखान हिजरी 900 मध्ये म्हणजे इ.स.1494 मध्ये आल्याची नोंद आहे. त्यावेळी कोकणात नागोजीराव यांचे राज्य होते. नागोजीने रत्नागिरी पासून समुद्रात आणि जमिनीवर या परकीयांशी टक्कर दिली.

दाभोळला तुंबळ रणसंग्राम झाला. त्यात आझमखान मरण पावले. परंतु नागोजीचा पराभव झाला. त्या अगोदर (1348-1500) येथे बहामनी राजवटीत दाभोळचे नाव मुस्तफाबाद यांच्या मुलाने ते बदलून हामजाबाद असे ठेवले. येथील जंगल साफ केले आणि गाव नव्याने वसविले. सुधारणा केल्या , बाजार सुरू केला. आझमखान यांचे शिर तवसाळ येथे आहे व धड दाभोळला आहे. त्यांचा ऊरूस 27 रजाग (शबे मेराज) ला मोठया इतमामाने साजरा होतो या प्रसिद्ध पिरांशिवाय आणखी लहानसहान पीर आहेत. आता ऊरूस करण्याची प्रथा परिस्थितीनुरूप बंद पडत चालली आहे.

कुणी एखादा संबंधित इसम थोडाफार खर्च करून या शहिदांची याद करतो. पिरांच्या या दर्ग्याव्यतिरिक्त गावात अनेक मशिदी आहेत. दाभोळला 360मशिदी होत्या, अशी लोककथा सांगितली जाते. आजच्या घडीला मात्र ढोरसई मोहल्ल्यातील फरमान चबुतरा, तांबडी मोहल्ल्याच्यी फत्ताह मशीद, वणकर मोहल्ल्यातील जामे मशीद व बामणे मोहल्ल्यातील मुनी मशीद एवढया चार मशिदींतच दैनंदिन नमाज व इतर कामकाज चालू आहे. दाभोळमध्ये फड बंदर हे सर्वांत जुने बंदर आहे तेथे काकाची जुनी मशीद प्रसिद्ध होती. त्या जागेवर आता ऊर्दू हायस्कूलची प्रचंड इमारत झाली आहे. खारवाडी जवळची अली मशीद ही एक जुनी प्रचंड पडीक मशीद आहे. इ.स. 1649 मध्ये औरंगजेबाच्या कारकर्दीमध्ये त्याचा या जिल्ह्याचा सुभेदार पीर अहमद अब्दला याने बांधलेली जुम्मा मशीद ही भग्नावस्थेत आहे आणि तिसरी एक जुनी प्रचंड मशीद समुद्रकिनारी सादतअली यांच्या स्मरणार्थ 1558 मध्ये बांधलेली आहे. त्या ठिकाणी 1875 साली लाकडावर कोरलेला मजकूर मिळालेला आहे. त्याच्या बाजूलाच ख्वाजा खिझरचा दर्गा आहे. या दोन्ही वास्तू शियापंथीय वाटतात. जामा मशिदीतील मिळालेला शिलालेख मुंबईच्या प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियममध्ये आहे.

त्या काळात दक्षिण हिंदुस्तानातून मक्केला (हाजला) जाणारे सर्व प्रवासी दाभोळ बंदरातून गलबतात बसून जात होते, तर अरबस्तानातून अरबी घोडयांची आयात दाभोळ बंदरात होत असे. विजापूर-गुहागर हा राजमार्ग होता. आजही पंढरपूर-क-हाड-चिपळून-गुहागर रस्त्याचे विजापूर-गुहागर असेच नाव आहे. असा हा दाभोळ गाव अनेकवेळा बरबाद झाला. तितकेवेळातो परत आबाद झाला. जर्मन, इंग्लिश, रोमन, अरेबियन अनेक प्रवाशांनी दाभोळला भेट दिली आणि तेथील तत्कालीन वर्णने लिहून ठेवली आहेत.

इतिहासात डोकावाल तर दाभोळचे इतिहासकालीन महत्त्व सहज ध्यानात येते. दाभोळचे ऐतिहासिक स्थान सांगणा-या वास्तू आज भग्नावस्थेत आहेत. काहींची जेमतेम निशाणी आहे.तर काही ठिकाणी फक्त लाहन-लहान खुणा उरल्या आहेत.

भारताच्या पश्चिम किना-यावरील दाभोळ हे सर्वांत जुने बंदर आहे.

दाभोळ बंदर

दाभोळ बंदर आजही गजबजलेले असते. तेथून मुख्यत: मच्छीमारीचा व्यवसाय मोठया प्रमाणावर चालतो. येथे मिळणारे विविधि प्रकारचे मासे थेट मुंबई आणि परदेशात जातात. दिपसभराच्या प्रवासानंतर सायंकाळी बंदरावर पाहोचल्यावर तेथे चालणारी मच्छीमार बोटींची वर्दळ, त्यावरील कोळी-कोळीणी यांची लगबग हे सगह पाहण्यासारखं आहे. काहीजण समुद्रावरून मासेमारी करून परतलेले असतात तर कसही रात्रीच्या सफरीची तयारी करत असतात.

वेगवेगळ्या प्रकारचे मासे टोपल्या भरभरून धक्क्यावर उतरत असतात. त्यांचे आकार, रंग, पाहून त्यांची नावे विचारण्याचे कुतूहल निर्माण होत. तेथेच माशांचा बाजार भरून लिलावाद्वारे त्यांची विक्रीही होते आणि ट्रकमध्ये बर्फात घालून ते रवाना केले जातात. या वेळी धक्क्यावर चालणारा कोळी-कोळीणी संवाद, बाजारभाव, माशांची प्रतवारी, त्यांची वाहतूक हे सारं पाहताना नाक दाबावं लागलं तरी या वेगळया विश्वात आपण रमून जातो.

बंदरावर उभे राहिल्यावर समोर दिसतात ती वेलदूर, धोपावे ही गावं. चिपळूनहून येणा-या या वाशिष्ठी नदीच्या खाडीचे दृश्य विहंगम दिसते. या खाडीच्या मुखाशी अंजनवेलचा किल्ल्यापर्यंत मोटार रस्ता आहे तर अंजनवेल गावातून चढूनही वर जाता येते. रात्रीच्या वेळी येथील दीपगृहातील फिरता प्रकाशही नजरेस पडतो. डोंगरावर आधुनिकतेकडे नेण्या-या बहुचर्चित एन्रॉनच्या लाल चिमण्याही दिसतात.

दाभोळ बंदरातून दर तासाला सुवर्णदुर्ग शिपिंग अ‍ॅन्ड मरिन सर्व्हिसेसद्वारे फेरीबोटीने पर्यटकांबरोबरच मोटार व मोठ्या बसेसचीही वाहतूक चालते. यामुळे आपण स्वत:च्या वाहनातून पलीकडच्या तीरावर जाऊन चिपळून-गुहागर, वेळणेश्वर, हेदवी अशा पर्यटनस्थळांना भेटी देऊन सायंकाळीपर्यंत पुन्हा अंजर्ल्यास परतू शकतो. या फेरीबोटमुळे गणपतीपुळे, रत्नागिरी ही गावे जवळ आली आहे आहेत.